ताजे अपडेट

चंदगडमधुन शक्तीपिठ महामार्ग जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ग्रीन सिग्नल

नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला धाराशिवपर्यंत कोणताही विरोध नाही. पुढील भागातही शेतकऱ्यांचे फारसे आक्षेप नाहीत. तरीही शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत सरकारने ‘शक्तिपीठ’चा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील रामगिरी या त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी आयोजित दिवाळी मीलन कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर भेटीदरम्यान विमानतळावर सुमारे ५०० शेतकऱ्यांनी भेट घेतली. या शेतकऱ्यांनी त्यांच्या सात-बारासह स्वाक्षरी केलेले पत्र दिले व आमच्या गावातून शक्तिपीठ महामार्ग जाऊ द्या, अशी मागणी केली. जे लोक या महामार्गाला विरोध करत आहेत त्यांच्या सात-बारांची तपासणी करा, असेही या शेतकऱ्यांनी सुचवले. शक्तिपीठ महामार्गाविरोधात उठणारा आवाज राजकीय नेत्यांचा आहे. शेतकरी मात्र या महामार्गाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. चंदगड विधान सभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी हजारो लोकांचा मोर्चा काढत आमच्या भागातूनच हा महामार्ग नेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सरकारने प्रकल्पाचे संरेखन बदलत चंदगडमार्गे नेण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मार्गामुळे तेथील अडथळेही कमी होतील आणि प्रकल्प सुरळीत पार पडेल. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही काही नवीन सरेखन सुचवण्यात आले आहेत. या भागांतील काही जोडण्यांवर सरकार विचार करत आहे. काही ठिकाणी किरकोळ अडचणी येतील, पण एकूण प्रकल्पाच्या अंमलबजावणीस मोठा विरोध होणार नाही. प्रकल्पाला सुरुवातीला विरोध होणे ही नवीन गोष्ट नाही. पुणे विमानतळाची घोषणा केली तेव्हाही सुरुवातीला विरोध झाला होता, पण शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाल्यानंतर ९५ टक्के जमीन सहमतीने उपलब्ध झाली. फक्त पाच टक्के प्रकरणे कौटुंबिक कारणांमुळे अडकली, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका