राजकारण

माणगाव गटात तरुण नेतृत्वाची घडी बसतेय

मानसी कल्लाप्पा भोगण आघाडीवर

कोवाडः माणगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत तरुण, सुसंस्कृत व उच्च शिक्षित उमेदवार म्हणून मानसी कल्लाप्पा भोगण या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातून आलेल्या मानसी भोगण यांचे वडील माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन असून आई सौ. अनिता भोगण ह्या कोवाड गावच्या विद्यमान सरपंच आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधित्व आणि जनसेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळालेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवत असून माजी आमदार राजेश पाटील तसेच डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. अनुभव आणि नव्या विचारांची सांगड घालत त्यांनी प्रचाराची दिशा ठरवली असल्याचे दिसून येते.

सध्या मानसी भोगण यांनी माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू केल्या असून, नागरिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न समजून घेत आहेत. पाणी, रस्ते, शिक्षण, महिला व युवकांसाठी संधी, आरोग्य सुविधा आदी मुद्द्यांवर त्या ठोस भूमिका मांडत आहेत. त्यांच्या साध्या, आपुलकीच्या आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

विशेषतः तरुण, महिला आणि नवमतदारांमध्ये मानसी भोगण यांच्याबद्दल मोठा उत्साह दिसून येत असून, “नवीन विचारांचे, अभ्यासू आणि लोकांशी जोडलेले नेतृत्व” अशी प्रतिमा त्यांच्या प्रचारातून उभी राहत आहे. गावोगावी मिळणारा वाढता पाठिंबा पाहता माणगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्यांनी आघाडी घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आता अर्ज माघारीनंतर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी, सध्या तरी मानसी कल्लाप्पा भोगण यांच्या प्रचाराची गती, जनसंपर्क आणि मिळणारा प्रतिसाद पाहता माणगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक चुरशीची ठरणार हे निश्चित मानले जात आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका