कुदनूर जिल्हा परिषद गटातुन सौ. विद्या विलास पाटील निवडणुक रिंगणात

“मी जास्त बोलत नाही, पण माझ्या कामातून मी माझे कर्तृत्व यापूर्वीच दाखवून दिले आहे,” अशा स्पष्ट शब्दांत माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. विद्या विलास पाटील यांनी कुदनूर जिल्हा परिषद गटातील उमेदवारीबाबत आपली भूमिका मांडली. मागील कार्यकाळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राबवलेल्या विविध विकासकामांचा अनुभव आणि जनतेचा विश्वास हाच आपल्या प्रचाराचा मुख्य आधार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुदनूर जिल्हा परिषद गटातून पुन्हा एकदा माजी आम. राजेश पाटील व डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घड्याळ ह्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय हा केवळ राजकीय नव्हे, तर जनतेच्या आग्रहातून घेतल्याचे त्या म्हणाल्या. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सुविधांसाठी केलेली ठोस कामे आजही मतदारांच्या स्मरणात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपले पती विलास पाटील हे कॉन्ट्रॅक्टर असले तरी त्या माध्यमातून त्यांनी नेहमीच जास्तीत जास्त समाजकार्याला प्राधान्य दिले असल्याचेही सौ. विद्या पाटील यांनी स्पष्ट केले. विकासकामांसोबतच गरजू लोकांना मदत, सार्वजनिक प्रश्नांवर तत्परता आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग हीच त्यांच्या कुटुंबाची ओळख असल्याचे त्या म्हणाल्या.
कुदनूर मतदारसंघाशी आपले भावनिक नाते अधोरेखित करताना त्या म्हणाल्या की, “मी या मतदारसंघात नवखी नाही. हेच माझे माहेर असून इथल्या प्रत्येक गावाशी, प्रत्येक कुटुंबाशी माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे.” त्यामुळे मतदार मला एक लेक म्हणून ओळखतात आणि हाच विश्वास पुन्हा मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनुभव, विकासकामांची शिदोरी आणि मतदारांशी असलेली घट्ट नाळ याच्या बळावर कुदनूर जिल्हा परिषद गटात सौ. विद्या विलास पाटील यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत असून, आगामी निवडणुकीत त्यांना मतदारांकडून भक्कम पाठिंबा मिळेल, असे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.


