
चंदगड : जिल्ह्यात जारी असलेल्या दारुबंदी व. शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत आपल्या गाडीत गोवा बनावटीच्या अवैध दारूचा साठा आणि बंदीस्त शस्त्रे बाळगून जात असलेल्या तिघांना चंदगड पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक केली. या कारवाईत तब्बल १२ लाख १८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी दोनच्या सुमारास हेरे चौक ते चंदगड दरम्यान ही घटना उघडकीस आली.
हेरे येथील चौकात गस्तीदरम्यान पोलीस नाईक वसीम देसाई यांनी कारला थांबण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने गाडी थांबवण्याऐवजी ती वेगाने पळवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून गाडी अडवली. वाहन चालक जोतिबा वैजू चव्हाण, संतोष मारुती चव्हाण, महंतेश मल्लप्पा देसाई रा. मुरकुटेवाडी, ता. चंदगड हे तिघेही संगनमताने गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे १७७६० रुपयांच्या मद्याच्या ९६ बाटल्या सापडल्या. कार जप्त करण्यात आली.
जप्त केलेल्या गाडीत लोखंडी तलवार आणि लोखंडी टॉमी ही सापडली. गाडी जप्त केल्यानंतर शिकार केलेल्या साळींद्राचा वास परिसरात पसरला. त्यासंबंधी चंदगड पोलिसांनी वनविभागाला कळवले असून वनविभागाकडून वेगळा गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान या तिन्ही आरोपींना तीन डिसेंबर अखेर पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल अजय वाडेकर करीत आहेत.