दौलत-अथर्वचा या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होणार का ?
कामगारांचा शिफ्टवर बहिष्कार; शेतकरी, तोडणी वाहतुकदारांची नाराजी
चंदगड (प्रतिनिधी) : दौलत-अथर्व साखर कारखान्यातील कामगारांच्या मागण्यांवरून सुरू असलेल्या वादावर जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा सुचवून देखील शुक्रवारी कामगारांनी शिफ्टमध्ये येण्यास नकार दिल्याने कारखाना अद्याप सुरू झाला नसल्याने यंदाच्या गळीत हंगामावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे शेतकरी, सभासद आणि वाहतूकदार यांची चिंता वाढली आहे.
दौलत कारखान्याच्या कामगारांच्या प्रश्नी मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत कारखाना प्रशासन आणि कामगार प्रतिनिधी यांच्या ११ मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. बहुतांश मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असल्या तरी त्रिपक्षीय वेतन करारावर कामगार आग्रही आहेत आणि त्यानुसार यापूर्वी २०२२ मध्ये जिल्हाधिकारी यांनी त्रिपक्षीय करार आणि अथर्व व्यवस्थापन या दोघांच्या सामंजस पणाने योग्य तोडगा काढला होता तरीदेखील कामगार आता परत २०१९ मधला करार करण्यास आग्रही आहेत त्यानुसार साखर आयुक्तांच्या मध्यस्थीने त्यावर निर्णय घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच या विषयावर प्रशासन आणि कामगारांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या त्यानुसार कारखाना प्रशासनाने २९/१०/२०२५ रोजी बैठक आयोजित केली पण त्या बैठकीस संघटनेचे प्रमुख पदाधिकारी गैरहजर राहिले असे व्यवस्थापन म्हटले आणि चर्चा होऊ नाही शकली. अखेर शुक्रवारी कामगारांनी शिफ्टमध्ये येण्यास नकार दिला. त्यामुळे कारखाना सुरू होऊ शकला नाही.
कामगारांच्या या निर्णयामुळे कारखाना परिसरात सकाळपासूनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी, सभासद आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने कारखाना परिसरात जमा झाले होते. गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण असून वाहतूक यंत्रणा सज्ज आहे, टोळ्या दाखल झाल्या आहेत. पण कारखाना सुरू नसल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. शेतकरी आणि वाहतूकदारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही लाखो रुपये खर्चून तोडणी यंत्रणा आणली आहे. कारखाना सुरू न झाल्यास आमचं नुकसान कोण भरून देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वाहतूकदार मधुकर करडे, संजय सुरुतकर आणि विश्वास सावंत यांनी स्पष्ट इशारा दिला की, दरवर्षी कामगार आणि प्रशासनातील वादाचा फटका आम्हा शेतकऱ्यांना आणि वाहतूकदारांना बसतो. या वादामुळे आमचं मोठं आर्थिक नुकसान होतं. जर लवकरात लवकर यावर तोडगा निघाला नाही, तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. शेतकरी सभासद के. जी. पाटील यांनी सांगितले की, पावसामुळे आधीच ऊसाचे नुकसान झाले आहे. आता हंगाम सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. कारखाना सुरू राहण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले, पण प्रशासन आणि कामगारांनी एकत्र निर्णय घेतला नाही, तर दौलत कारखान्याच्या अस्तित्वावरच संकट येईल. यावेळी वाहतूकदार रामा वांद्रे, संभाजी चोथे, सागर पाटील, जोतिबा पाटील, राणबा फडके, रमेश पाटील, राजू लांडे, कृष्णा पाटील यांच्यासह शेतकरी, सभासद उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने कारखाना तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. कारखाना प्रशासनाने याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत यापूर्वी २०२२ मध्ये मा. जिल्हाधिकारी यांनी त्रिपक्षीय करार आणि २०२२ मध्ये अस्तित्वात असणारे वेतन या दोघांच्या मध्ये मध्ये काढून निर्णय दिला होता आणि त्यानुसार पगारवाढ देखील केली आहे आणि आता देखील १७% वाढ अणि पुढील वर्षी १७% वाढ आणि दरवर्षी १००० रुपये महागाई भत्ता पोटी वाढ जाहीर केली आहे. मा. जिल्हाधिकारी यांचा २०२२ चा निर्णय असताना कामगार संघटना परत २०१९ चा करार बाबत विनाकारण कारखाना व्यवस्थापनास वेठीस धरत आहे.गळीत हंगाम अगदी तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे कारखाना सुरू होणे अत्यावश्यक आहे. मात्र, कामगारांनी शिफ्टमध्ये येण्यास नकार दिल्याने अडचण निर्माण झाली आहे. तरीही कारखाना प्रशासनाने कामगारांना आवाहन केले आहे की, शेतकरी आणि सभासदांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आणि तातडीने कामावर शिफ्ट मध्ये रुजू व्हा.
सध्या दौलत साखर कारखान्यातील स्थिती तणावपूर्ण आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतरही अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ऊसगळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता वाढली असून, शेतकरी, सभासद आणि वाहतूकदार यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन आणि कामगारांमधील चर्चेतून तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—



