चंदगडमध्ये काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक रिंगणात
अडकुर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने प्रचाराला मोठा वेग दिला असून “विचारांची साथ – काँग्रेसचा हात” या संकल्पनेखाली व्यापक प्रचार मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने अडकुर गटातील विकासाचे प्रश्न, शेतकरी-मजूरांचे प्रश्न, युवक व महिलांचे सक्षमीकरण तसेच मूलभूत सुविधांच्या मुद्यांवर ठाम भूमिका मांडली आहे.
काँग्रेस पक्षाने अडकुर जिल्हा परिषद गटासाठी शिवाजी सतबा तुप्पट तर पंचायत समितीसाठी सौ. शितल संभाजीराव देसाई , गवसे पंचायत समिती गणासाठी सौ. सिंधु अनंत कांबळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. तिन्ही उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचार बॅनरमध्ये काँग्रेस पक्षाची ‘हात’ ही पारंपरिक निवडणूक निशाणी, पक्षाचे विचार आणि नेतृत्वाचा विश्वास ठळकपणे मांडण्यात आला आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे चंदगड तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई, एम. जे. पाटील, विक्रम चव्हाण-पाटील, संदिप नांदवडेकर तसेच सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत.
शिवाजी सतबा तुप्पट हे सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेले उमेदवार असून स्थानिक प्रश्नांबाबत त्यांची ठाम भूमिका सर्वपरिचित आहे. तर सौ. शितल संभाजीराव देसाई व सौ. सिंधु अनंत कांबळे या महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जात असून महिलांचे प्रश्न, स्वयंसहायता बचतगट, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या कामासाठी त्या सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत. त्यामुळे तिन्ही उमेदवारांना सर्वसामान्य जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
या प्रचार मोहिमेत जिल्हा व तालुका पातळीवरील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत असून गावोगावी प्रचार सभांद्वारे काँग्रेसच्या धोरणांची माहिती दिली जात आहे. काँग्रेस पक्षाने स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले असल्याने मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
सदर प्रचारामुळे अडकुर परिसरात राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीची रंगत वाढली आहे. आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असून अडकुर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध प्रतिस्पर्धी पक्ष अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.



