दौलत-अथर्व साखर कारखान्यातर्फे २१.१३ कोटींची ऊस बिले जमा
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत–अथर्व साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत १५ डिसेंबर अखेरपर्यंतची २१ कोटी १३ लाख ९० हजार रुपयांची उसाची एफ.आर.पी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. यंदाच्या गळीत हंगामास सुरुवात झाल्यापासून डिसेंबर अखेरपर्यंत कारखान्याने एकूण ६२ हजार १७३ मे. टन ऊस गाळप यशस्वीपणे पूर्ण केले असून, सध्या कारखान्यात दररोज सरासरी ३,४०० मे. टन ऊस गाळप सुरळीतपणे सुरू आहे.
कारखान्याने १ डिसेंबर ते १५ डिसेंबअखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या उसासाठी प्रतिटन ३,४०० रुपये दराने एफ.आर.पी अदा करण्यात आली असून, एकूण २१ कोटी १३ लाख ९० हजार रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात आली आहे. वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने एफ.आर.पी अदा केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याच्या व्यवस्थापन, संचालक मंडळ व प्रशासनाच्या समन्वयातून गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू असून, आगामी कालावधीत ऊस गाळप क्षमतेत आणखी वाढ करण्याचा कारखान्याचा प्रयत्न असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत कारखाना प्रशासनाने हंगाम यशस्वी करण्याच्या दृष्टीने काम केले असून शेतकऱ्यांची देखील वेळेत बिले जमा केली आहेत. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी हंगाम यशस्वी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ग्वाही खोराटे यांनी यावेळी दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक विजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण, शेती अधिकारी युवराज पाटील, लेबर ऑफिसर अश्रू लाड, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवण आदी उपस्थित होते.



