तुडये जिल्हा परिषद गटात सौ. रचना राहुल गावडे यांच्या प्रचाराला वेग
जनतेतुन उत्स्फूर्त प्रतिसाद

तुडये (प्रतिनिधी) : तरुण नेतृत्त्व, सुशिक्षित दृष्टिकोन आणि काहीतरी करून दाखवण्याची प्रामाणिक इच्छा या बळावर तुडये जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. रचना राहुल गावडे यांनी प्रचार दौऱ्यात स्पष्ट आघाडी घेतली आहे. हलकर्णी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या म्हणून त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत, सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
राजकीय व सामाजिक वारसा लाभलेली ही उमेदवारी असून सौ. रचना गावडे यांचे सासरे भरमाण्णा गावडे हे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राहिले आहेत. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि प्रशासनाचा अनुभव असलेल्या कुटुंबातून आलेल्या सौ. रचना राहुल गावडे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला व बालकल्याण, तसेच शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे.
त्यांचे पती राहुल भरमाण्णा गावडे हे हलकर्णी गावचे विद्यमान सरपंच असल्याने गावाच्या विकास प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता त्यांच्या कामातून दिसून येते. या अनुभवाचा उपयोग जिल्हा परिषद स्तरावर करून तुडये गटाचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा संकल्प आहे.
प्रचार दौऱ्यातील भेटीगाठी, घराघरांत संवाद, युवक-युवती व महिलांशी थेट चर्चा, शेतकरी व कामगारांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना सुचवण्याची त्यांची पद्धत नागरिकांना भावत आहे. “विकास हा कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे,” हा संदेश देत त्या मतदारांशी आपुलकीने संवाद साधत आहेत.
शिक्षण, आरोग्य सुविधा, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, महिलांचे सबलीकरण आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम या मुद्द्यांवर ठोस आराखडा मांडत सौ. रचना राहुल गावडे यांनी प्रचारात वेग घेतला आहे. त्यामुळे तुडये जिल्हा परिषद गटात त्यांच्या उमेदवारीकडे आशेने पाहिले जात असून, प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची आघाडी अधिकच भक्कम होत असल्याचे चित्र दिसत आहे.


