चंदगड तालुका गुणवंताची खाण-मानसिंग खोराटे
सुरज कांबळेचा दौलत-अथर्व कारखाना प्रशासणाकडून सत्कार

चंदगड : “सुरजसारखे होतकरू विद्यार्थीच समाजाला दिशा देतात. आर्थिक अडचणी, साधनांची कमतरता, परिस्थितीची मर्यादा हे कोणत्याही यशाच्या मार्गातील कायमस्वरूपी अडथळे नसतात, हे सुरजने सिद्ध केले आहे. प्रत्येक तरुणाने शिक्षणाचा ध्यास घेऊन स्वतःसह आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे परिवर्तन घडवावे. कारखाना प्रशासन शिक्षण क्षेत्रातील प्रतिभावंत आणि जिद्दी विद्यार्थ्यांच्या पाठिशी नेहमीच ठामपणे उभे राहील,” असे प्रतिपादन दौलत-अथर्व साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी दयानंद देवाण यांनी केले.
करंजगावचे सुपुत्र सुरज नारायण कांबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत उद्योग निरीक्षक पदावर निवड मिळविल्याबद्दल दौलत-अथर्व कारखाना प्रशासनाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संचालक विजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, केनयार्ड सुपरवायझर पी. डी. सरवदे शेती विभाग प्रमुख विश्वनाथ ओऊळकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सुरजच्या जिद्द, शिस्तबद्ध अभ्यास आणि निर्धाराचे कौतुक केले. सुरजचे वडील नारायण कांबळे हे नुकतेच कारखान्यातून सेवानिवृत्त झाले असून आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना देखील मुलाच्या शिक्षणात कुठेही कमी पडले नाहीत. त्यांच्या संघर्षासह सुरजच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी संचालक विजय पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मराठे यांनीही सुरजचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी दौलत अथर्व कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चंदगड तालुका हा गुणवंतांची खाण आहे, या तालुक्यातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी कारखाना भक्कमपणे उभा असून तालुक्यातील होतकरू व गुणी विद्यार्थ्यांनी जिद्दीने आपले करिअर घडवावे असे सांगून ते म्हणाले की, “सुरजची कामगिरी प्रेरणादायी असून ग्रामीण भागातील मुलांनी त्याचा आदर्श घ्यावा. होतकरू, वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कारखाना प्रशासन नेहमी सहकार्याचे धोरण ठेवेल,” असे सांगून त्यांनी सुरेशचे विशेष कौतुक अभिनंदन केले.