चंदगड तालुक्यातील सर्व साखर कारखाने ३४०० रुपये दर देणार.
आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने ओलम, दौलत, इको केन कारखान्यांचे ३४०० रुपये दरावर एकमत

चंदगड तालुक्यातील सर्व साखर कारखाने ३४०० रुपये दर देणार.
आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने ओलम, दौलत, इको केन कारखान्यांचे ३४०० रुपये दरावर एकमत
चंदगड प्रतिनिधी: चंदगड विधानसभा मतदारसंघातील ऊस पिकाचे अतिवृष्टी आणि जंगली प्राण्यांच्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. खतांच्या किंमतीमध्ये आणि लागवडीसाठी येणाऱ्या इतर खर्चांमध्येही दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत आहे. तरीही चंदगड मतदारसंघातील शेतकरी मोठ्या कष्टाने ऊसाची शेती करत आहे. सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील साखर कारखाने ऊसाला ३१००-३२०० रुपयांच्या दरम्यान दर देत आहेत. परंतु हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही, अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा दर वाढवून मिळणे गरजेचे होते. या अनुषंगाने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी आ.शिवाजी पाटील, अथर्व दौलत, ओलम, इको केन साखर कारखाना चालक-मालक आणि शेतकऱ्यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत आ.शिवाजी पाटील यांनी ऊसाला किमान ३६०० रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली. परंतु सरते शेवटी या बैठकीत सर्वानुमते यावर्षी ३४०० रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे, इको केन चे बाबासाहेब देसाई, ओलमचे युनीट हेड संतोष देसाई, एच.आर.महेश भोसले, विजय मराठे, अश्रु लाड, दिपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भावकू गुरव, राम पाटील, अशोक कदम, संग्राम अडकुरकर व शेतकरी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी ५ वा. ऊसाच्या दरा संदर्भात आ.शिवाजी पाटील यांनी मौजे कार्वे ता.चंदगड येथे प्रमुख शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ. पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे आणि समस्या ऐकून घेतल्यावर तातडीने रात्री १० वा. त्यांच्या निवासस्थानी चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्वच कारखान्यांच्या मालक- चालकांसोबत शेतकऱ्यांची बैठक लावली. या बैठकीत आ.पाटील यांच्यासह उपस्थित सर्व प्रमुख शेतकरी प्रतिनिधींनी ऊसाला ३६०० रुपये दर मिळावा अशी मागणी लावून धरली. जिल्ह्यातील इतर काही साखर कारखाने हा दर देत आहेत असे शेतकऱ्यांनी सांगितले, त्याच धर्तीवर चंदगड मतदारसंघातील शेतकऱ्यांना ३६०० रुपये दर मिळाला पाहिजे असे म्हणणे शेतकऱ्यांनी मांडले. परंतु कारखाना चालक-मालकांनी आपली बाजू मांडताना ३६०० रुपये दर देणाऱ्या कारखान्यांची भौगोलिक परिस्थिती आणि आमच्या कारखान्यांची भौगोलिक परिस्थिती, ऊस वाहतूक अंतर, टोळ्यांच्या अडचणी, हंगाम सुरु होण्यास झालेला विलंब, दौलत मधील कामगारांचा संप व इतर तांत्रिक अडचणी भिन्न असून या सर्व बाबींचा विचार करता ३६०० रुपये दर देणे आम्हांला परवडणारे नसून यामुळे कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईस येतील असे सांगितले. यावेळी त्यांनी यावर्षी ३३०० रुपये दर देऊ असे सांगितले परंतु हा दर आ.पाटील यांच्यासह उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी अमान्य केला. त्यामुळे ही बैठक रात्री १२ वाजून गेले तरी सुरुच होती. सरते शेवटी सर्वांचे ३४०० दरावर एकमत झाले. तसेच यावेळी आ.पाटील यांनी ऊसाच्या वजनामध्ये काटामारी अजिबात सहन केली जाणार नाही असे सर्व कारखानदारांना सांगितले. काटामारी करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले.
आ.शिवाजी पाटील यांनी दौलत कामगार संपानंतर ऊस दराचा प्रश्नही शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक भूमिका घेत यशस्वीपणे हाताळल्याने चंदगडसह संपूर्ण जिल्ह्याला एक चांगले शेतकरी नेतृत्व मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्याचबरोबर आंदोलने, मोर्चे काढून शेतकरी, कारखानदार, कामगार वेठीस धरने, प्रशासकीय यंत्रणा वेठीस धरणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे यापेक्षा आ.शिवाजीराव पाटील जाग्यावर निर्णय घेण्यात पटाईत असल्याने त्यांचे निर्णय खरोखरच शेतकऱ्यांसाठी हिताचे धरत आहेत. ‘खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी’ ही कोल्हापूरकरांची प्रसिद्ध म्हण आ.शिवाजीराव पाटील यांना परफेक्ट लागू होत असल्याची भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे. आ.पाटील स्वतः एक शेतकऱ्याचा पूत्र असल्याने शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि त्यांच्या व्यथा त्यांना माहीत आहेत. शेतकऱ्यांचा फायदा घेऊन, त्यांचा वापर करुन तोडपणी करणारे शेतकरी नेत्यांपेक्षा जाग्यावर निर्णय घेऊन निस्वार्थीपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडत असलेले निस्वार्थी शेतकऱ्यांचे नेतृत्व म्हणून आ.शिवाजी पाटील उदयास येत आहेत.



