हेरे-पारगड रोडवर गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

चंदगड : संशयित भरधाव कारची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल शिनोळी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाका पथकाने जप्त केल्याची घटना पारगड-हेरे रस्त्यावर मंगळवारी घडली. याप्रकरणी सांगली येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुखदेव बाळासो कट्टीकर (वय २४), प्रमोद संभाजी हंडीफोड (वय २६) (दोघेही रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी हे दोघेही कारमधून भरधाव वेगाने पारगडहून हेरे गावाकडे जात होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी कार थांबवली. तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. त्यामुळे कारसह ५ लाख ८८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, हरिभाऊ लांडे, जवान राहूल शिंदे, किरण बागूल, तुषार पवार, हर्षवर्धन भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
